फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित…

Published:

ठाणे  – फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

फी आणायला विसरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्याप्रमाणे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी शाळेला भेट देवून चौकशी केली. शिक्षण हक्क कायद्याने विद्यार्थ्यांना मानसिक अथवा शारीरिक इजा प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यानुसार, शिक्षिकेची चौकशी व्हावी असे स्पष्ट करण्यात आले.

इयत्ता सहावीच्या एका तुकडीच्या वर्गशिक्षिकेने अशी शिक्षा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शाळा व्यवस्थापनाने पुढील चौकशी होईपर्यंत त्या शिक्षिकेस निलंबित केले असल्याची माहिती राक्षे यांनी दिली. अशाप्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी शाळेला सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच, चौकशीचा पाठपुरावा शिक्षण विभाग करीत आहे.

यासंदर्भात, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जाच निर्माण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शालेय विदयार्थ्यांना भावनिक किंवा शारीरिक छळाला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करणे प्रतिबंधित आहे. या परिस्थितीचा मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतो. तरी शाळांनी याचे भान राखणे गरजेचे आहे. असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page