‘या’ तालुक्याचे नामांतरण राजगड करा – अजित पवार…

Published:

मुंबई – पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण ‘राजगड’ करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे. त्यावेळी वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींनी, तालुक्याचे नामांतरण राजगड करण्याचे ठराव सादर केले होते. किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतरण करण्यात यावे अशी मागणी पत्रातून अजित पवारांनी केली आहे. तसेच पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करणेबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील सर्व नागरिकांचे जिव्हाळयाचे संबध आहेत. सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले. वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे, अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे असे देखील अजित पवार म्हणाले.

वेल्हे तालुक्यात शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट आहेत. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण ‘राजगड’ करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी असे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page