मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेण्याचे कोणतेही कारण नाही. असे अजित पवार म्हणाले.

आपण सातत्याने माझ्याबद्दल बातम्या देत आहात, त्यामध्ये यत्किंचित तथ्य नाही, आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचे दाखवत आहात, ते सर्व विविध कामानिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. अजित पवार राष्ट्रवादीत राहणार हे अॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का? असा सवालही त्यांनी केला.

बातम्यांचा विपर्यास सुरू आहे. माझ्या ट्विटर हँडलवर आहे तसे आहे. मी काय झेंडा सारखाच धरून ठेवू. काही झाले असेल, तर मीच सांगेन. तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. कशाची गरज नाही. आता या गोष्टींना पूर्णविराम द्या. आम्ही सर्व परिवार म्हणून काम करत आहोत. जे काही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आमचीही सहनशीलता कधी-कधी संपते. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका. असेही अजित पवार म्हणाले.
कोणीतरी बातम्या पेरण्याचे काम आमच्याबद्दल विघ्नसंतोषी लोक करत असतील. काही काही बाहेरच्या पक्षाचे लोक एनसीपीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. आमचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये. आता कोणतेही गैरसमज पसरवू नका. आता या विषयाचा तुकडा पाडा. हा विषय इथेच संपवा, असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.