डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामे चालू असून, आयरे गाव या ठिकाणी तर कहरच केला आहे. ‘ग’ प्रभाग क्षेत्रात अनेक अनधिकृत बांधकामे चालू असून, त्याबाबत अनेक तक्रारी करून देखील सदर अनधिकृत बांधकामांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महापालिका उपायुक्त सुधाकर जगताप यांना सदर बाबत तक्रार केल्यास ते तक्रादारांना उडवाउडवीची उत्तर देतात. त्याना कॉल केल्यास ते तक्रारदाराचा नंबर ब्लॅक लिस्ट ला टाकतात. असे अनेक वेळा घडले आहे.
‘ग’ प्रभाग क्षेत्रातील खाडी किनारी असणाऱ्या अनधिकृत चाळींचे बांधकाम चालू असतानाही अनेक तक्रारी केल्या तरी सदर चाळी बांधणाऱ्या भूमाफियांवरती काहीही कारवाई केली नाही. न्यू आयरे रोड अटल बिहारी वाजपेयी गार्डन समोर असणारे ७ माळ्याच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार केली असता सदर ठिकाणावरील लोक गाववाले आहेत आणि त्यातील काही लोक राजकीय मंडळींशी संबंधित असल्याकारणाने आम्ही काही करू शकत नाही असे उपायुक्तांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, तक्रारदार यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रादारांसमोर ग’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना फोन करून तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये अनधिकृत बांधकामांना अभय देणारे पालिका अधिकारीच आहेत का असा प्रश्न आता निर्माण होत आहे.