मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अजित पवारांनी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्तही प्रकाशित झाले. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणाले, खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे.
मंगळवारी (१८ एप्रिल) मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे. तेथे कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असेही अजित पवार म्हणाले.