महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेक फोन केले असा आरोप शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी केल्यानंतर रोहित पवार यांनी नरेश म्हस्के यांना जोरदार उत्तर दिले आहे. नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावे, असे रोहित पवार म्हणाले.
मी नरेश म्हस्के यांना कधीही भेटलेलो नाही. मी त्यांच्याबद्दल कधी काही ऐकलेलं नाही. फक्त एकच गोष्ट ऐकली आहे, त्यांना जेव्हा ठाण्याचा नगराध्यक्ष बनायचे होते. त्यावेळी आत ते ज्या पार्टीत आहेत त्या पार्टीतील नेत्यांनी विरोध केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगून त्यांना नगराध्यक्ष केले. आज ते ज्या पार्टीत आहेत, त्या पार्टीतील नेत्यांना विरोध करण्यासाठी नरेश म्हस्के काँग्रेसमध्येही जाणार होते. आता त्याच विरोध करणा-या नेत्यांची ते बाजू घेत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे, असे रोहित पवार म्हणाले.
नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावे. म्हस्केंना एकच सांगतो, त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीही कळणार नाही त्यांनी तसा प्रयत्न करु नये.