कल्याण – अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली असून, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी रितेश दुसाने या इसमास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व परिसरात राहणारा अल्पवयीन मुलगा स्टेशनला उतरला. मात्र घरी जाण्यासाठी त्याच्याकडे रिक्षावाल्याला द्यायला पैसे नव्हते. त्याने रिक्षा घरी नेऊन घरुन पैसे घेऊन देऊ असा विचार करुन रिक्षा घरापर्यंत घेऊन गेला. मात्र घरी गेला तर घर बंद होते. यामुळे तो शेजारी, मित्रांकडे 100 रुपये मागत होता. पण त्याला कुणीही पैसे देत नव्हते. त्याचवेळी रितेश दुसाणे हा तेथे उभा होता. त्याने मुलाला विचारणा केली आणि रिक्षाचे १०० रुपये दिले.
पैसे देण्याच्या बहाण्याने रितेशने मुलाशी मैत्री केली. मग त्याला आपल्यासोबत लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर रितेशने या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच या बद्दल कुणाला सांगितलेस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली.
दरम्यान घडलेला प्रकार मुलाने घरी सांगितला त्यानंतर घरच्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करत रितेशला अटक केली.