अंबरनाथ – शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, माझ्यावरील आरोप हा हास्यास्पद प्रकार आहे. नरेश म्हस्के पुराव्यासकट बोलले आहेत. संजय राऊत यांचे सहकारी चिंदरकर यांचाही जबाब पोलिसांनी घेतला. आधी राऊत म्हणाले जीवे मारायची सुपारी दिली. मग जबाब दिला काळे फासणार आहेत. हे चिंदरकर यांनी सांगितल्याचे म्हणाल्यामुळे त्यांचा जबाब पोलीसांनी घेतला. मी कुणाचे नाव घेतले नाही, असे चिंदरकर आपल्या जबाबात म्हणाले होते. त्यामुळे दोन्ही जबाबात विरोधाभास आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती आहे. रोज सकाळी उठून कुणावरही ते आरोप करतात. मी एक डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीकडे पाहून मला वाटतं की, सिझोफ्रेनिया सारखा आजार त्यांना होतोय का? काल्पनिक, आभासी विश्वात ते राहतायत. महाराष्ट्राला संजय राऊत यांची गरज आहे, कारण सकाळी त्यांच्यामुळे महाराष्ट्राची करमणूक होते. त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.