mumbai – राज्यात सुट्ट्या खाद्य तेलावर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले असून, सुट्टे तेल विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई होणार आहे.

प्रशासनाच्या पाहणीत अनेक बिगर नोंदणीकृत खाद्यतेल कंपन्या आढळून आल्या असून, मोहरीच्या तेलात अनधिकृत मिश्रण करून भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. मुळात सुट्ट्या स्वरूपात खाद्यतेल विकणे नियमाबाह्य असूनही त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू होती. या तेलाचा मूळ स्रोत अज्ञात असल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक असून विषबाधेची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांनी सुट्टे तेल विकू नये आणि नागरिकांनी ते खरेदी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोहरीच्या तेलात कोणतेही इतर मिश्रण चालणार नाही, ते १०० टक्के मोहरीचेच असावे लागेल. तसेच यापुढे सर्व प्रकारचे खाद्यतेल केवळ पॅकेजिंग स्वरूपातच विकता येईल.
दरम्यान, खाद्य तेलाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्यास १० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.


