ratnagiri – जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एक १२ वर्षीय मुलगा जखमी झाला. प्रणव येसरे असे या मुलाचे नाव असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव हा गुरे राखण्यासाठी त्याठिकाणी गेला होता. त्यावेळी त्याला शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब आढळून आला. उत्सुकतेपोटी तो हाताळत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की प्रणवच्या हाताला, छातीला तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची पाहणी केली. तसेच पुढील तपास सुरु केला.
दरम्यान, शिकारीसाठी जंगल परिसरात गावठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


