raigad – महाबळेश्वर-पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते. हे तरुण दापोलीतील हरणे बंदर येथे फिरण्यासाठी गेले होते.

परत येत असताना आंबेनळी घाटातील दाभोळ गावाच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सर्वांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रायगड व सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड आणि पोलादपूर येथील ट्रेकर्स संस्थांसह स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारातच दरीत उतरून तात्काळ शोध व बचाव कार्य सुरू केले. आणि मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीत एकूण ८ जण प्रवास करत होते. अवघड वळणावर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये आसगाव ता. सातारा येथील चार, बोरगाव ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील एक, मर्ढे ता.जि. सातारा येथील दोन, खटाव ता. खटाव जि. सातारा येथील एक अशा आठ युवकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.


