डोंबिवली – मेकअप आर्टिस्ट असलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून दागिने आणि पैसे चोरी केले असल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. सदर प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली आहे. कल्पना राठोड व अंकिता इंगळे उर्फ अंकिता परब अशी या दोघींची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, पूजा गुप्ता या काही कार्यक्रमानिमित्त घरडा सर्कल येथील Banquet हॉल मध्ये आल्या होत्या. त्यावेळी कार्यक्रम सुरु असताना कल्पना आणि अंकिता या दोघींनी पूजा यांच्या पर्स मध्ये असलेले सोन्याचे इअर रिंग्स, सोन्याची चैन आणी ५०००/- रुपये कॅश असा एकूण ७०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. सदरबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळलेल्या माहितीच्या आधारे दावडी, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व परिसरात शोध घेऊन कल्पना आणि अंकिताला अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील दागिने आणि ३०००/- रुपये असे एकूण ६८,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सपोनि योगेश सानप, मपोउपनि आशा निकम, पोहवा प्रशांत सरनाईक, दत्ता कुरणे, पो.अं देविदास पोटे, महिला पो.हवा.आशा सूर्यवंशी यांनी केली.