बुलढाणा – समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. हि बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. त्यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या बसमध्ये ३२ प्रवासी होते. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.