पुणे – खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात पकडले. अमोल प्रकाश कोरडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), सागर तुकाराम शेळके (पोलिस शिपाई), सुदेश शिवाजी नवले (खासगी व्यक्ती) अशी या तिघांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी त्यांच्या ओळखीच्या इसमास हातऊसणे व बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. सदरचे बँक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे ऊसणे दिलेल्या पैशाची मागणी केली असता, त्यांनी त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी स.पो.नि. अमोल कोरडे यांच्याकडे असल्याने तक्रारदार यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी अमोल कोरडे, सागर शेळके व नवले यांनी १,५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
त्यानुषंगाने अमोल कोरडे आणि शेळके यांच्यावतीने नवले यांनी १,५०,०००/- रुपयांची लाच मागणी केली. त्यानंतर सदर लाच रक्कम नवले यांनी स्वीकारली असता तिघांना एसीबीने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.