डोंबिवली – भेसळयुक्त खाद्य तेल प्रकरणी राम नगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. तारीख मेहमूद अतिक अहमद आणि दिलीप मोहिते अशी या दोघांची नावे आहेत. सदर प्रकरणी पोलिसांनी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अडाणी विल्मार या कंपनीचे फॉरच्युन सनफ्लॉवर खाद्य पदार्थाचे तेल भासविण्याकरीता त्यावर फॉरच्युन कंपनीचे स्टिकर लावून भेसळयुक्त तेल विक्री केल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी राम नगर पोलिसांनी निकुंज भानुशाली या व्यक्तीस डोंबिवलीत अटक करून त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर निकुंज भानुशाली याच्याकडे केलेल्या तपासात त्याने सदरचे भेसळयुक्त तेल हे दिपक जैन या व्यक्तीकडून खरेदी केले असल्याचे सांगितले.
भानुशाली याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिपक जैन याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. परंतु पोलिसांनी त्याच्या गोडाऊन वर छापा टाकून एकूण ५,४५,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जैन याच्याकडे काम करत असलेल्या तारीख मेहमूद अतिक अहमद आणि दिलीप मोहिते या दोघांना अटक केली.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास राम नगर पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश जाधव करत आहेत.