मुंबई – मालाडमधील मालवणी परिसरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रे दरम्यान गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. शोभायात्रेवीळी दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार रामनवमी निमित्ताने मालाडच्या मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. याच शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.शोभा यात्रेदरम्यान काही लोकांकडून दगड फेक आणि चप्पल फेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.