मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्याच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये बोलताना संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरुद्ध सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. अंधारे यांनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली.
संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही, तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आहे. तसेच त्यांची भाषा बहीण- भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. तसेच यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हण्टले आहे.