मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा…
मुंबई – राज्यभरात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, स्वा. सावरकर यांचा त्याग, त्यांचे देशाप्रती आलेल्या समर्पणाच्या निमित्त राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वा. सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. देशासाठी आंदोलन करताना त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या पद्धतीने वावरण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी यासाठी त्याग केला, त्यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जात असून याचा निषेध संपूर्ण देशभरात होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणाले आहेत कि, आमचे आदर्श, स्वातंत्र्यानंतर सुद्धा यातना सहन करावे लागलेले एकमात्र आणि ज्यांनी एक नव्हे तर दोन वेळा काळ्यापाण्याच्या शिक्षा भोगल्या, असे थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा पोकळ दम उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर काल दाखविले गेले. वस्तुतः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना आणि समाप्तीच्या वेळी सुद्धा दोन वेळा राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांना अपमानित करण्याची भूमिका घेतली आणि त्यावर उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या आमदारांनी मौन राहणेच पसंत केले. चकार शब्द उच्चारला नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरीरीने बचाव करताना मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना वीर सावरकर यांचा अपमान दिसला नाही. हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता.
आता जाहीर सभेत वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा अत्यंत बालिश आणि जनतेला मूर्ख समजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पण जनतेने तुमचा दुटप्पीपणा ओळखला आहे. तुम्ही बोलत रहा, आम्ही मारल्यासारखे करतो, असाच हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी चालविला आहे. उद्धव ठाकरे एकीकडे ही विधाने करीत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे मात्र, ‘दोन्ही पक्ष वेगळे आहेत आणि ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे’, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत करतात. म्हणजेच कुणी काय बोलावे, हेही घरात बसून ठरविल्यासारखे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता अशी कितीही मल्लिनाथी केली, तरी त्याचा काहीही फायदा नाही. आपली प्रेरणास्थाने जेव्हा अपमानित होतात आणि तेव्हाही आपण मूग गिळून गप्प बसतो, तेव्हा तो राजकारणातील हताशेचा, अनुनयाचा, हतबलतेचा परमोच्च बिंदू असतो. अशा अवस्थेत त्याचा निषेध करून तरी काय उपयोग?
राहुल गांधी यांचा मात्र आम्ही तीव्र निषेध करतो. या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येतील आणि ठिकठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येईल.