महिलांना आज पासून एसटी प्रवासात ५० टक्के सवलत…

Published:

मुंबई – आज पासून सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. राज्य सरकारचा शासन अध्यादेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात ५० टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते. या आदेशाचा जीआर निघाला असून शुक्रवार पासून (१७ मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या यात साधी, मिडी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आज पासून ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच यापुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये ही सवलत मिळणार आहे.

तसेच जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे आरक्षण करतील, मोबाईल अॅपमाध्यमातून तिकीट घेतील त्यांच्याकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी ज्या महिलांनी आधी तिकीट आरक्षण केले आहे. त्यांना याचा लाभ मिळणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page