मुंबई – शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शितल, तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील असे त्या म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा पद्धतीने त्रास दिला जातो, हे आपण आजपर्यंत पाहिलं आहे. पण आता विकृतीने कळस गाठला आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. एखाद्या बाईला थांबवू शकत नाही, मग तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, अशा पद्धतीचे विकृती व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एका शीतल म्हात्रेचा नाहीए, शीतल सारख्या हजारो महिला राजकारणात काम करतात. आज तिचा नंबर आहे, उद्या आमचा नंबर असले, त्यामुळे हा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. पण याचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. यामागे असलेल्या कर्ता करविता धनीला शोधून काढा आणि त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.