मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करून हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत सांगितले. दरम्यान, गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला. राऊतांच्या याच वक्तव्यावरुन सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही केली.
यावर निर्णय देताना राज्याच्या विधानमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान हे विधानमंडळ खपवून घेणार नाही. राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी भारतीय संविधानाचा आणि विधीमंडळाचा अपमान केला आहे. यातून महाराष्ट्राचा देखील अपमान झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होणे आवश्यक असून सदस्यांच्या विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करुन ८ मार्चला पुढचा निर्णय जाहीर करीन असे राहुल नार्वेकर म्हणाले.