ठाणे – शासकीय कार्यालये, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या मुलांना खाऊ देणे व स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांचे सबलीकरण व बालकांचा विकास योजने अंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील पहिले हिरकणी कक्ष ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस स्थानकाच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. या हिरकणी कक्षाचे उद्घाटन पोलीस उपअधिक्षक जितेंद्र आगरकर यांच्या हस्ते व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आले.
![](https://maharashtranewschannel.com/wp-content/uploads/2023/02/b98188fd-678f-45ac-b554-944d1c49f671.jpg)
जिल्ह्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, गर्दीच्या शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त हजारो महिला त्यांच्या बालकांसोबत प्रवास करीत असतात. या महिलांना त्यांच्या बालकांना खाऊ देणे व स्तनपान करणेसाठी सुरक्षित जागा नसल्याने बालकांना स्तनपान / खाऊ घालण्यास अडचणी येत होत्या. ही अडचण सोडविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीकडे महिलांना त्यांचे बालकांना स्तनपानासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावास महिला व बाल विकास आयुक्त यांनी तांत्रिक मान्यता व जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता दिली. यानुसार ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ६० हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून जिल्ह्यातील पहिला हिरकणी कक्ष पडघा पोलीस स्टेशनमध्ये उघडण्यात आला आहे. या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरिक्षक साबळे, महिला व बालविकास अधिकारी गायकवाड, पोलीस उप निरिक्षक पाटील आदी उपस्थित होते.
असा असेल हिरकणी कक्ष
ठाणे जिल्ह्यात ६० विविध ठिकाणी हिरकणी कक्ष उघडण्यात येणार आहेत. या कक्षात स्वच्छ सूर्यप्रकाश, मोकळी हवा, पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी वॉटर प्युरीफायर, बालकांसाठी खेळणी, मनोरंजनासाठी टीव्ही संच, एकाच वेळी दोन महिलांकरिता स्वतंत्र बेड, जनरेटर, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरा इ. सोयी पुरविण्यात आलेल्या आहेत.