नवी मुंबई – बोलण्यात गुंतवून वृद्धांना लुबाडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल पोलिसांनी अटक केली. नरेश जयस्वाल आणि बाबु मणचेकर अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाखांचे दागिने जप्त करून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले.
याबाबत वृत्त असे आहे कि, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत काही अज्ञात इसम वयोवृध्द नागरीकांना अचानक रस्त्यात अडवून पुढे नाकाबंदी चालू आहे तुमचे दागिने व्यवस्थीत ठेवा. तसेच तुम्ही मला ओळखले नाही का ? मी मोठा शेठ, दुकानदार आहे असे सांगून बतावणी करून बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने फसवून नेले असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नरेश जयस्वाल आणि बाबु मणचेकर या दोघांना रबाळे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात अटक केली. तसेच त्यांच्याकडून ५,३०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहर येथील विविध पोलीस ठाण्यातील एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले.