हिंगोली – काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. प्रज्ञा सातव यांनी स्वत: फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून ही माहिती दिली.
माझ्यावर आज अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. कळमनुरीच्या कसबे धवांडा येथे हा प्रकार घडला. मी दौऱ्यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर हल्ला होणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. पाठीमागून भ्याड हल्ले करु नका, समोरुन येऊ लढा, असे प्रज्ञा सातव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर अस्ताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई , इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता. असे फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी म्हंटले आहे.
याप्रकरणी सातव यांच्या तक्रारीनंतर हल्लेखोरावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.