pune – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८६ वर्षांचे होते.
नारळीकरांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसी इथल्या हिंदू विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. नारळीकरांचं शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झालं. 1957 मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली होती. या परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले.
नारळीकर यांचं चार दशकांहून अधिक काळापासून खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू होतं. त्याचसोबत ते पुस्तकंही लिहित होते. सर्वसामान्य माणसाला खगोलशास्त्रज्ञ समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अभयारण्य’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘प्रेषित’ अशी अनेक विज्ञानकथांची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.