dombivali – प्रत्येकाने शिवरायांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगिकारावा, म्हणजे त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली (पूर्व) घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
शिवराय म्हणजे अखंड लोकशाहीचा अविष्कार, शिवराय म्हणजे त्याग, शौय, धैर्य, समर्पण, युद्धनिती, युगपुरुष व युगप्रवर्तक असा रयतेचा राजा होय. त्यांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध होता. नव्या पिढीला हा पुतळा प्रेरणा व ऊर्जा दिल्या शिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. या सरकारने जनतेसाठी कल्याणकारी योजना राबविल्या, त्यामुळे सरकारला दैदिप्यमान यश मिळाले. प्राचिन गड किल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवं, यासाठी या सरकारने पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही वाटचाल करीत आहोत, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकार आश्विन व आतिश पालवणकर यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
डोंबिवलीचे प्रवेश द्वार यापूर्वी घरडा सर्कल म्हणून ओळखलं जायचं, आजपासून “छत्रपती शिवाजी महाराज चौक” म्हणून ओळखले जाईल. या पुतळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना, नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी दिला. हा केवळ पुतळा नव्हे, तर युवा पिढीसाठी अभिमान जागविणारा क्षण आहे, असे उद्गार कल्याण लोकसभेचे मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात काढले. छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती त्यांनी वीररसपुर्ण काव्य पंक्तींच्या माध्यमातून केली. महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा सांस्कृतिक नगरी डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर उभा राहत आहे, ही कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिवरायांच्या या भव्य पुतळ्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची, खंबीरपणाची, शौर्याची, साहसाची, न्यायाची आणि कर्तृत्वाची यशोगाथा कल्याण-डोंबिवली नागरिकांच्या कायम स्मरणात राहील, यात शंकाच नाही, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, संग्राम (बापू) भंडारे महाराज, हिंदुराष्ट्र सेनाप्रमुख धनंजयभाई देसाई, शिवसेनेचे राजेश कदम यांची देखील भाषणे झाली. काल सायंकाळी डोंबिवलीत संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यासाठी मा.आमदार राजेश मोरे, शिवसेना नेते गोपाळ लांडगे, भाजपा नेते नरेंद्र सूर्यवंशी शशिकांत कांबळे व इतर मान्यवर, महापालिका अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, इतर अधिकारी वर्ग तसेच कल्याण-डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.