डोंबिवली – खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या चार जणांना राम नगर पोलिसांनी अटक केली. तखतराज सागरमल राणावत, प्रदिप बाबलाल जैन, सुखलाल जयचंद जैन आणि प्रभा राजेंद्र गुप्ता अशी या चार अटक आरोपींची नावे आहेत.

सदर गुन्ह्यात एकूण ११ आरोपींचा समावेश असून यापूर्वी जगन्नाथ गौहरी मन्ना, चंद्रकांत दलीचंद शाह यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव आणि त्यांच्या टीमने मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे अटक केली होती. त्यानंतर पुन्हा मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव आणि त्यांच्या टीमने वरील चौघांना ३१/१/२०२३ रोजी अटक केली.

याबाबत वृत्त असे आहे कि, सन २०१२ पासून फिर्यादी दिपक तन्ना यांचे वडील माधवजी हिरजी ठक्कर यांच्या नावे असलेल्या ७/१२ उतारा जमिनीवर मुकुंद को. ऑ.हौ. सोसायटी आहे. उर्वरीत मोकळ्या जागेत आरोपींनी अनाधिकृत पत्रा शेड उभा करून कालांतराने सदर पत्र शेड गाळा क्रमाक १ आहे. सदर बेकायदेशीर पत्राशेड को.म.पा.ने सन २०१६ मध्ये बेकायदेशीर असल्याने पाडून सुध्दा आरोपींनी सदर पत्रा शेड पुन्हा उभे करून सदर पत्रा शेडला गाळा क्रमांक १ असे दर्शवून फिर्यादी यांचा भाऊ विनय माधवजी ठक्कर यांच्या स्टॅम्प पेपरवर फोटो व बनावट सहीचा खोटया रितीने उपयोग करून इलेक्ट्रिक मिटर घेतला.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खोटया मेंटनन्स पावत्या व सोसायटीचे बनावट मेंबर प्रमाणपत्र मिळवून पत्राचे बेकायदेशीर बांधलेल्या शेडला अधिकृत शॉप नं.१, मुकुद निवास असे भासवून फिर्यादी यांच्या जमिनीवर अप्रामाणिकपणे हक्क / कब्जा करण्याचे हेतूने आजपावेतो खोटे व बनावट कागदपत्र तयार करुन फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याबाबत राम नगर पोलीस ठाण्यात २९०/२०२२ भा.द.वि.क. ४२०, ४६७, ४६८, ४७१, १,२०(ब) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचून तखतराज सागरमल राणावत, प्रदिप बाबलाल जैन, सुखलाल जयचंद जैन आणि प्रभा राजेंद्र गुप्ता या चौघांना ३१/१/२०२३ रोजी अटक केली. अशा प्रकारे या गुन्ह्यात एकूण ६ जणांना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यातील मुकुंद को.ऑ.हौ.सोसायटीचे व्यवस्थापन कमिटीचे चेअरमन, रमेश नानु खंडेलवाल, कॅशिअर, विजया टी. राणावत, सचिन घोलप आणि नारंगी देवी निनावत हे फरार आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास राम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.