भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा एकाच दिवशी अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात १ फायटर जेट विमान कोसळले. तर दुसरी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. सुखोई 30 आणि मिराज 2000 विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे भारतीय हवाई दलाचे एक विमान कोसळले. पिंगोरी रेल्वे स्टेशनजवळ हे विमान कोसळले. या विमानाने आग्र्याहून उड्डाण केले होते विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

तर दुसऱ्या घटनेत मध्यप्रदेशातील मुरैना येथे सुखोई ३० आणि मिराज २००० या हवाई दलाच्या दोन विमानांचा अपघात झाला. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केले होते. सुखोई-३० मध्ये २ वैमानिक आणि मिराज २००० मध्ये १ वैमानिक होता, दोन वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.