जागृत विस्फोटच्या गर्भगृहात डोंबिवली एमआयडीसी…

Published:

केमिकल कंपनीमुळे डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आणि बघता बघता डोंबिवली एमआयडीसी परिसरात अग्नितांडव उसळला. 12 जून 2024 च्या सकाळी साडेनऊ वाजता इंडो अमाईन्स या केमिकल कंपनीला आग लागली. त्यावेळी काही मिनिटांच्या फरकाने एक एक करून या कंपनीत विस्फोट होऊ लागले. आग चारही दिशांनी पेटू लागली. वायू गळती झाली असावी म्हणून लोक आपापल्या घरातून बाहेर आले. चारही दिशांना आग पाहून ते घाबरले आणि जीव मुठीत घेऊन ते सुरक्षित जागेवर पोहोचले. या विस्फोटामुळे लोखंडाचे छोटे छोटे तुकडे परिसरात पसरले.कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या वाहनांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले.

याआधी आठ पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीतच अशाच एका केमिकल कंपनीला आग लागली. त्या आगीत अनेक माणसे मृत्युमुखी पडली. या घटनेची चौकशी सुरू असताना, आता 12 जून 2024 ला इंडो अमाईन्स केमिकल कंपनीला आग लागली. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसर जागृत स्फोटच्या गर्भगृहात उभा आहे असे वाटते. डोंबिवलीच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीने येथे केमिकल औद्योगिक झोन निर्माण केला. यामुळे अनेक केमिकल कंपन्या येथे निर्माण झाल्या. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा राज्य सरकारने या केमिकल झोनकडे दुर्लक्ष केले आहे असे आता अशा घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे. कारण ज्या ठिकाणी केमिकल औद्योगिक झोन असतो त्या ठिकाणी अजिबात लोकवस्ती नसते परंतु डोंबिवलीत मात्र या कंपन्यांच्या आजूबाजूला गजबजलेल्या इमारती आहेत. त्यामुळे या परिसरात जर कोणत्याही प्रकारे स्फोट झाला तर इथल्या इमारती हदरतात. घरावरचे पत्रे उडून बाजूला पडतात. मोठ्या आवाजामुळे रहिवाश्यांच्या कानाच्या पडद्यांना इजा होते. त्यात वायुगळती सारखे प्रकार होऊन रहिवाश्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. एमआयडीसी परिसरात सर्वत्र कंपन्या असल्यामुळे आग संपूर्ण एमआयडीसी परिसराला लागू शकते ही भीती लोकांच्या मनात कायम असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महाराष्ट्र सरकारने या घटनांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. असे इथल्या जाणकार नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथली एमआयडीसी हटवावी अशी मागणी या जाणकार लोकांनी केली आहे. असे अनेक रहिवाश्यांच्या प्रतिक्रियेतून आपल्या सर्वांना समजून येते.

2014 पासून ते 2018 पर्यंत डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेकदा कंपन्यांना आग लागली आहे. दरम्यान, त्या त्या वेळी सरकारने कामगारांना आणि रहिवाशांना नुकसान भरपाई म्हणून मदतीचा हात दिला आहे. परंतु असे हात कितीही दिले तरीही इथली समस्या कमी होणार नाही त्यामुळे सरकारने इथली एमआयडीसी हटवून लोकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा. कारण मिळणाऱ्या पैशापेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यांचे होणारे मालमत्तेचे नुकसान हे मोठे आहे. कारण माणूस वर्षानुवर्ष मेहनत घेतो तेव्हा तो स्वतःची जागा, बँक बॅलन्स तयार करतो. अशा प्रकारच्या घटनांमुळे क्षणार्धात सामान्य माणसाच्या मालमत्तेचे नुकसान होते. ते नुकसान सरकारच्या मदतीने भरून काढता येत नाही. याकरता सामान्य लोकांना सरकारने एमआयडीसी हटवून मानवी कल्याणाचा दिलासा द्यावा.
तसेच अशा घटना सदोष मनुष्यवध या कायद्यांतर्गत येतात. यामध्ये केमिकल कंपन्यांच्या मालकांना आरोपी म्हणून उभे केले जाते. त्यावेळी स्थानिक सरकारही या ठिकाणी जबाबदार असते हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. त्यामुळे या घटनांकडे जबाबदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने पहाणे गरजेचे आहे. सरकार कोणाचे जरी असले तरी इथला सामान्य माणूस तुमचा मतदार असतो. या मतदारांच्या भावना सरकारी पक्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत.

12 जून 2024 च्या या घटनेनंतर सरकाराने खऱ्या अर्थाने जागे होण्याची गरज आहे. असे इथल्या प्रत्येक नागरिकांना वाटत आहे. कारण दरवेळी डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात अशा जीवघेण्या घटना घडतात. आगीमुळे कामगार व स्थानिक लोकांचे प्राण जातात. त्यावेळी कल्याण डोंबिवली शहरातले आमदार, खासदार या घटनास्थळी येऊन केवळ सामान्य नागरिकांना आश्वासन देतात. त्यावेळी ते कायम म्हणतात, आम्ही डोंबिवलीचा केमिकल औद्योगिक झोन उठवण्याच्या प्रयत्नात आहोत. लवकरच आम्ही इथला केमिकल झोन हटवू पण गेल्या सात, आठ वर्षात इथल्या आमदार, खासदाराने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले दिसत नाही. ही सरकारी पक्षाची दिरंगाई आता सामान्य जनतेला सहन न होणारी आहे. म्हणून इथले नागरिक आज संताप व्यक्त करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे कि, सामान्य माणसाचा जीव गेला तरीही हे राजकीय नेते बघू, करू, सांगू ही आश्वासनेच देत आहेत.
त्यांना सामान्य माणसाच्या जीवाची अजिबात परवा उरलेली नाही. निरडावलेपणाने हे राजकीय लोक सर्व काही बघून डोळेझाक करत आहेत. त्यामुळे डोंबिवली शहर महाराष्ट्राच्या नकाशावर राहिल का? अशी भीती व्यक्त होत आहे. आता तरी सरकारी पक्षाच्या आमदार, खासदारांना जाग यावी असे वाटते.

कोणत्याही शहराचा विकास तसेच औद्योगिक क्रांती प्रत्येकाला हवी असते, परंतु जीवावर बेतणारी औद्योगिक क्रांती कुठल्याही शहराला नको असते. ही मानव व्याख्या लक्षात ठेऊन डोंबिवली शहराचा हा महत्त्वाचा प्रश्न सरकारी पक्षाने लवकरात लवकर निकालात काढावा आणि एमआयडीसीत राहणाऱ्या डोंबिवलीवासीयांना जगण्याचा मोकळा श्वास द्यावा.

श्री. युवराज सुर्ले

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page