नवी दिल्ली – बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यात बैलगाडा शर्यत, जलीकट्टू, कंबाला यांना परवानगी देणाऱ्या कायद्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला असून तामिळनाडू सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आहे. यासोबत महाराष्ट्र सरकारचा कायदाही वैध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा रस्ता मोकळा झाला आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यावर कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत, तामिळनाडूने जल्लीकट्टू, कर्नाटकने कंबालाबाबत जे कायदे केले आहेत ते वैध आहेत. जल्लीकट्टू हा खेळ तामिळनडूच्या संस्कृतीचा भाग आहे. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. जर प्राण्यांना क्रूर पद्धतीने वागणूक दिली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.