डोंबिवली – ओला कार चालकास लुटणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी अटक करून एकूण २,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रकात उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा रुपीपाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया अशी अटक करण्यात आलेल्या इसमाची नावे असून, एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी राजन चौधरी हे ओला कार चालक असून ते त्यांची कार घेऊन नेवाळी नाका, बदलापुर पाईप लाईन रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी आले असता, त्यांना रात्रीच्या सुमारास नेवाळी येथून डोंबिवलीला भाडे आल्याचा कॉल ओला कंपनीकडून आला, त्याप्रमाणे ते नेवाळी, कल्याण पूर्व येथून ३ पॅसेंजरना घेऊन डोंबिवली येथील घारडा सर्कल ठिकाणी आले असता, त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारला व रिक्षा त्यांच्या कारच्या पुढे उभी केली, त्यानंतर त्या रिक्षेतील २ इसमांनी चौधरी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आणि शिवीगाळ केली. त्यानंतर कारमध्ये बसलेले तीघेसुद्धा चौधरींशी वाद करु लागले आणि या पाचही इसमांनी चौधरींना मारहाण करुन त्यांचे पाकीट जबरीने काढून ते रिक्षेतून पळुन गेले. त्यानंतर चौधरी यांना गाडीत ठेवलेले २ मोबाईल नसल्याचे लक्षात आले. सदर प्रकाराबाबत चौधरी यांनी दिलेल्या तक्ररीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रकात उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा रुपीपाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया यांना अटक केली. तसेच याप्रकरणात एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.आणि एका पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.
सदर प्रकरणी रोख रक्कम, मोबाईल तसेच इतर गुन्हयात चोरलेले ९ मोबाईल, १ लॅपटॉप, रोख रक्कम, फिर्यादीचे ओळखपत्रे, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकूण २,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, अटक इसम हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुध्द डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि कल्याण दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिरी. गुन्हे बाळासाहेब पवार, सपोनिरी. सुरेश डाबरे, सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनि भानुदास काटकर, पोहेकॉ विकास माळी, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ संजय मासाळ, पोहेकॉ गिरीश पाटील, पोकों अशोक आहेर, पोकों विजय आव्हाड यांनी केली.