Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
मुंबई

भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण : अशोक चव्हाण….

सत्तेचा गैरवापर करून केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्नाटक मधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले आहे. भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून आज रेनिसन्स हॉटेलमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरणच केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदारांचे अपहरण करून त्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबण्यात आले आहे.काँग्रसचे नेते व कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार हे या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले असताना त्यांना भेटू दिले नाही. त्याच हॉटेलमध्ये शिवकुमार यांनी स्वतःसाठी खोली आरक्षित केली होती. पण पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्येही जाऊ दिले नाही. स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात गैर काय आहे ? पण भाजप सरकार एवढ्यावरच न थांबता पोलीस दलाचा गैरवापर करून शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मंत्री नसीम खान यांना अटक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहे. पण विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा डावच भाजप सरकारने आखल्याचे दिसते. याआधीही गोवा व मणिपूरमध्ये असेच षडयंत्र करण्यात आले होते. आता ते कर्नाटकचे सरकार पाडून भाजपचे सरकार स्थापन करण्याचा कुटील डाव खेळत आहेत. भाजपने लोकशाहीची क्रूर थट्टा चालवली आहे, असेही चव्हाण म्हणाले.

Related Articles

Close