Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
कोल्हापूर

शाहू जयंतीनिमित्त एकच भव्य मिरवणूक काढा ….

लोकराज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करताना शहरात वेगवेगळ्या मिरवणुका न काढता एकच भव्य मिरवणूक काढून समतेचे दर्शन घडवूया, अशी सूचना विविध वक्त्यांनी केली. मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी शाहू जयंतीच्या नियोजनाबाबत विविध तालीम संस्था, सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांची बैठक झाली. कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांतून जयंती साजरी करण्याबाबतची मते कोल्हापूर जिल्हा शाहू प्रेमी समितीच्या बैठकीत व्यक्त केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केवळ एक दिवस साजरी करण्यापेक्षा तीन ते चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकोत्सव स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.जयंती दिनी एकच भव्य मिरवणूक काढण्याबाबतही जिल्हाधिकारी तसेच विविध तालीम संस्थांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शाहू महाराजांचे कार्य सर्व पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांच्या कार्याचे कॅलेंडर प्रसिद्ध करण्याबाबतही चर्चा झाली.निवासराव साळोखे म्हणाले, जयंती हा विधायक कार्याचा उत्सव व्हावा. शाहू महाराजांच्या कार्याची माहिती पोहोचवण्यासाठी शाहू व्याख्यानमाला आयोजित करता येईल. तसेच पुढील जयंतीच्या कार्यक्रमासाठी शाहू महाराजांच्या दसरा चौकातील पुतळ्यासारखा फायबर पुतळा तयार करण्यात यावा, असे सुचवले. उमेश पोवार यांनी शाहू जयंती लोकोत्सव व्हावा, या दृष्टीने जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यावेळी बाबा पार्टे, आर. के. पोवार, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, नामदेव गावडे, अशोक भंडारे, प्रसाद जाधव, वैशाली महाडिक आदींनी मते मांडली.यावेळी आर. डी. पाटील, दिलीप सावंत, एस. के. माळी, निरंजन कदम, अनिल घाटगे, भाऊ घोगळे, हिंदुराव घाटगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Close