Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
सातारा

साखर आयुक्तालयाकडून अजिंक्यतारा कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव….

ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हिताला नेहमीच प्राधान्य देणा-या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने नुकत्याच संपन्न झालेल्या गळीत हंगामात २ हजार ८१५ रुपये प्रती टन याप्रमाणे एफआरपीनुसार ऊसाला दर दिला आणि गाळपासाठी आलेल्या ऊसाची एफआरपीप्रमाणे होणारी संपुर्ण रक्कम ऊसपुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग केली. या हंगामात एफआरपीनुसार शेतक-यांना १०० टक्के संपुर्ण रक्कम अदा करणारा अजिंक्यतारा साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला. दरम्यान, शेतक-यांप्रती असलेली बांधिलकी आणि कर्तव्य सक्षमपणे पार पाडून शेतक-यांची एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम अदा केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून अजिंक्यतारा कारखाना संचालक मंडळाचे लेखी पत्राद्वारे अभिनंदन केले असून पत्रात कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. कारखान्याच्या सन २०१८-१९ मधील गळीत हंगामात ६,३६,३३९ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ७,८५,४०० क्विंटल साखर उत्पादन झाले. गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची एफआरपीनुसार होणारी सर्व रक्कम कारखान्याने संबंधीत ऊस पुरवठादार शेतक-यांच्या खात्यात गळीत हंगाम संपत असताना जमा केली. शेतक-यांना एफआरपीनुसार होणारी संपुर्ण रक्कम वेळेत अदा करणारा सातारा जिल्ह्यातील पहिला कारखाना असा नावलौकिक मिळवलेल्या अजिंक्यतारा साखर कारखान्यावर राज्याच्या साखर आयुक्तालाकडूनही कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. शेतकरी हित जोपासत सहकाराचे उद्दीष्ट कर्तृत्वाने सिध्द करणाया अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी लेखी पत्र पाठवून केलेल्या उल्लेखिनिय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राचा सन २०१८-१९ चा गाळप हंगाम संपला असून गेल्या ६ महिन्यात साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी, वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल, कामगारांची देणी, वाहतूक खर्च, वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देत अजिंक्यतारा साखर कारखान्याने या हंगामात शेतक-यांची १०० टक्के एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केली ही बाब अतिशय अभिनंदनीय व कौतुकास पात्र असल्याचे साखर आयुक्त गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे. ऊस पुरवठादार शेतक-याने ऊस गाळपास दिल्यानंतर त्याच्या ऊसाच्या उत्पादनापोटी देय असलेली रक्कम, विहित मुदतीत म्हणजेच १४ दिवसांत देण्यासाठी एफआरपीची कायदेशीर तरतूद ऊस (नियंत्रण ) आदेशात करण्यात आलेली आहे. अशी रक्कम अदा करुन आपण शेतक-यांच्या प्रती असलेले उत्तरदायित्व कायदेशीररित्या पुर्ण केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील ज्या निवडक कारखान्यांनी गाळप हंगाम संपत असतांना १०० टक्के एफआरपीची रक्कम शेतक-यांना अदा केली आहे, अशा कारखान्यांमध्ये आपल्या कारखान्याचा समावेश आहे, हे नमूद करताना मला आनंद होत आहे, असेही गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे.अजिंक्यतारा कारखान्याने नेहमीच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून सुयोग्य व काटकसरीचे धोरण अवलंबून आदर्शवत कामाकाज केले आहे. दुष्काळी परिस्थिती, मुला-मुलींची लग्न आणि शिक्षण तसेच शेतीसाठी लागणारी बि-बियाणे, खते, औषधे आदी खरेदीसाठी शेतकरी नेहमीच ऊसाच्या बिलावर अवलंबून रहात असतो. शेतक-यांची गैरसोय होवू नये, बळीराजाच्या हातात हक्काचे घामाचे दाम दिले जावे, यासाठी अजिंक्यतारा कारखान्याच्या व्यवस्थापनाने योग्य प्रकारचे आर्थिक नियोजन करुन शेतक-यांना वेळेत एफआरपीनुसार संपुर्ण रक्कम अदा केली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि संपुर्ण संचालक मंडळ यांनी नियोजनबध्दरित्या कामकाज करुन ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सुयोग्य कारभार केला, हेच साखर आयुक्तालयाच्या पत्रावरुन सिध्द होते. साखर आयुक्तालयाची कौतुकाची थाप कारखाना व्यवस्थापनाच्या पाठीवर पडली असून आता कारखाना व्यवस्थापनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढेही कायम शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा कारखाना कार्यरत राहणार असून शेतक-यांच्या ऊसाला उच्चतम दर देवून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार करत राहील, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यानिमित्ताने दिली आहे.

Close