रत्नागिरि

पत्रकारांवर जीवघेणा हल्ला….

पत्रकार संरक्षण कायद्याचा पाळणा हलत नसल्याने महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये खंड नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पुढारीचे पत्रकार अनुज जोशी आणि सकाळचे पत्रकार सिद्धेश परशेटये यांच्यावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. त्यात दोन्ही पत्रकार जबर जखमी झाले आहेत. जुगार आणि मटकया बाबतची बातमी दिल्याने हा हल्ला केला गेला. सकाळीच या मटक्यावाल्यांनी पत्रकारांच्या कार्यालयात जाऊन त्यांना अर्वाच्च शिविगाळ केली होती. त्यानंतर सायंकाळी हल्ला केला गेला. या प्रकरणी खेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत वणजू यांनी या हल्लयाचा तीव्र शब्दात निषेध केला असून हल्लेखोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी एस.पीं.कडे फोनद्वारे केली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा रविवारी बीड जिल्हयातील वडवणी येथे होत असून पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात या मेळाव्यात निर्णायक भूमिका घेण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी जाहीर केले आहे. पत्रकार माईनकरांना धमकी….. टीव्हीवरील चर्चेत ज्येष्ठ पत्रकार जयंत माईनकर यांना ठोकून काढण्याची धमकी एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने दिली आहे. या धमकीचा देखील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.

Tags

Related Articles

Back to top button
Close