Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

खारघर येथील अल्पवयीन मुलींचा अपहरणाचा प्रयत्न…..

रात्रीची साडेदहा वाजण्याची वेळ, अल्पवयीन दोघीही मुली सायकलवरून घरी जात होत्या. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने तेथे काळोख होता. अचानक एक मोटार आली आणि त्या मोटारीतील एकाने त्या मुलींना मोटारीत खेचले आणि त्या दोघीही ओरडल्या. हीच ओरड ऐकून शेजारील इमारतीच्या रखवालदाराने तेथे धाव घेतली. आणि मोटारीतील त्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला. रखवालदाराशी झालेल्या धरपकडीत संबंधित मोटारीतील त्या दोघांनीही तेथून पळ काढला आणि दोन्ही अल्पवयीन मुली सुखरूप घरी पालकांपर्यंत पोहोचल्या. ही घटना शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमाराची आहे. खारघर येथील सेक्टर ३५ जी येथे राहणाऱ्या या अकरा वर्षीय मुलींसोबत हा अतिप्रसंग घडला. अद्याप या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात पालकांनी केली नव्हती. शुक्रवारच्या घटनेमुळे खारघरमधील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बंद असलेले पथदिवे सिडकोने सुरू करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सेक्टर ३५ जी येथील हरिद्रा इमारतीच्या प्रवेशद्वारा समोर ही घटना घडली. हरिद्रा इमारतीजवळ हाइड पार्क, अरिहंत अशा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत. शुक्रवारी रात्री येथे काळ्या रंगाची मोटार आली. चालकासह अजून एक व्यक्ती या मोटारीत होता. दोन्ही संशयितांनी तोंडाला मास्क लावल्याचे नागरिकांचे मत आहे. मोटारीतील एका व्यक्तीने या दोन्ही मुलींना खेचण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ असल्याने घटनास्थळी अन्य कोणीही हजर नव्हते. हजारो नागरीक हाइड पार्क, हरिद्रा व अरिहंत या सोसायटय़ांमध्ये राहतात. या घटनेमुळे समाजमाध्यमांवर नागरिकांना आणि विशेष लहान मुलांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. हाइड पार्क येथील रखवालदाराने वेळीच धाव घेतल्याने त्या रखवालदाराच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक करत आहेत. असेच कौतुक त्या दोन्ही मुलींनी वेळीच केलेल्या आरडाओरडीचेही सुरू आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली का? याचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. पोलिसांना एका नागरिकाचा फोन आल्यावर घटनेची माहिती पोलिसांनी घेतली. अद्याप संबंधित मुलींच्या पालकांनी तक्रार न दिल्याने तपासाला गती आली नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. परंतु या घटनेनंतर खारघर पोलिसांनी या परिसरातील सोसायटय़ांमध्ये नागरिकांना सुरक्षेविषयी वेगवेगळे मार्गदर्शन शिबीर राबविल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

Related Articles

Close