Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
रायगड

रेवदंडा जमिनीत गाडलेल्या तब्बल २२ तोफा उजेडात…..

रायगड जिल्ह्यातील ता. अलिबाग येथे असलेल्या रेवदंडा या प्रसिद्ध किल्ल्यावर १९ मे २०१९ रोजी दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आधीच्या गणनेव्यतिरिक्त नवीन २२ तोफा उजेडात आल्या आहेत. पोर्तुगीज काळातील या किल्ल्यात ३६ तोफांची नव्याने नोंद सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. या सर्व तोफांवर क्रमांक टाकण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांची गणना होईल असे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या पूर्वी संस्थेने या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि तोफ संवर्धन मोहिमा राबविल्या आहेत. या मोहिमेत किल्ल्यावरील जमिनित गाडलेल्या सहा तोफा संस्थेच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्या होत्या, ते बाहेर काढण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाने मोहिमेचे आयोजन करून बाहेर काढण्याचे ठरले. मोहिमेस संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली तोफ संवर्धन मोहिमेस सुरवात झाली. जमिनीत गाडलेल्या जवळपास एक टनपेक्षा जास्त वजनाच्या आणि आठ ते नऊ फूट लांबीच्या सहा ते सात तोफा जमिनीतून बाहेर काढून दगडी कातड्यावर ठेवण्याचे काम करण्यात आले. प्रचंड मेहनत करून या तोफांना पाच तासानंतर ४० हुन अधिक शिवप्रेमींनी बाहेर काढले. तर एक टीम किल्ल्याच्या तटबंदी बुरुज दरवाजे यांच्यावरील झुडपे काढू लागली या दरम्यान संस्थेचे सदस्यांना तीन १४ फुट खोलीची ३.५ फुट लांबीची भुयारे सापडली ही भुयारे काही अंतरा नंतर दगड मातीच्या मलब्याने बुजली आहेत. तर एक टीम तटबंदी बुरुज आणि किल्याच्या परिसरात तोफा शोधण्याचे काम करत होती. या दरम्यान शोध मोहिमेत किल्याच्या तटबंदी बुरुज आणि जमिनीत गाडलेल्या आणि पडलेल्या जवळपास २४ तोफा या सदस्यांच्या निदर्शनास आल्या या तोफा गज लागून झाडी झुडपात, नारळा पोफळीच्या बागेत तर काही जमिनीत गाडलेल्या होत्या. या पूर्वी किल्ल्याच्या इतिहास आणि दुर्ग अवशेषांवर झालेल्या लिखाणामध्ये फक्त सात तोफांचा उल्लेख होता. आज नव्याने २२ तोफांची भर होईल. तसेच ३४ तोफा किल्ल्यात असून दोन तोफा रेवदंडा ग्रामपंचायतीकडे सिमेंटच्या चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. एकंदरीत पोर्तुगीज काळातील या किल्ल्यात ३६ तोफांची नव्याने नोंद सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. या सर्व तोफांवर नंबर(क्रमांक) टाकण्यात आले आहेत. जेणेकरून त्याची गणना होईल. तसेच संस्थे मार्फत येत्या रविवारी ग्रामस्थांच्या सहकार्याने सूचना फलक आणि तोफा दिशा दर्शक स्थळ दर्शक लावण्याचे कामं सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागा मार्फत होईल असे अलिबाग विभाग अध्यक्ष संजय पाडेकर यांनी सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर गेल्या १२ वर्षापासून दुर्ग संवर्धन कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाने दुर्गसंवर्धन चळवळ महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. दर रविवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील दुर्ग संवर्धन मोहिमा संस्थेमार्फत राबविल्या जातात, त्यात किल्ल्यावर दरवाजे बसविणे, तोफांना तोफगाडे बसविणे, तटबंदी बुरुज पायऱ्या याची डागडुजी करणे तसेच शोधमोहीमेच्या माध्यमातून गडावरील दुर्ग अवशेषांचा शोध घेणे हे कार्य सतत न थांबता महाराष्ट्रभर सुरु आहे. या तोफांच्या नोंदी व मोजमाप करून याचा अहवाल दुर्ग संवर्धन विभागामार्फत राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्र पुरातत्व विभागाला देण्यात येणार आहे. किल्ल्याची सद्य स्थिती... हा किल्ला असंरक्षित स्मारक असून किल्ल्यातील पाच चर्च हे केंद्र पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहेत. त्यामुळे तटबंदी बुरुज दरवाजे शिलालेख आणि तोफा या संवर्धन आणि संरक्षित व्हावे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाकडे मागणी केली असता आजवर त्या मागणीला पुरातत्व विभागाने नाकारले आहे. किल्ल्यातील याही ऐतिहासिक वास्तू संरक्षित होऊन यांचे संवर्धन व्हावे म्हणून संस्थेमार्फत जिल्हाधिकारी राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्र पुरातत्व विभागाकडे नव्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रतील किल्ल्यांवर सलग मोहिमा घेऊन दरवाजे,तोफगाडे बसवून किल्ल्याच्या ऐतिहासिक लुप्त झालेत ते शोधून इतिहासात नव्याने भर घालण्याचे काम संस्था करत आहे असे मत संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी व्यक्त केले. या मोहिमेसाठी ओमकार तांबडकर, हर्षद घरत, अनिल ठाकूर, आकाश वर्तक, महादेव बापट, तसेच पोलीस पाटील स्वप्नील तांबडकर आणि रेवदंडा ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. मोहिमेत जवळपास ८० शिवप्रेमींचा सहभाग होता.

Related Articles

Close