You cannot copy content of this page
बीड

पाणी टंचाईच्या भीषण परिस्थितीत नागरिकांनी संयम बाळगावा – प्राजक्ता कराड…..

परळी शहरात यावर्षी भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत नगर पालिकेच्या वतीने विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत असून सध्या शहरात 28 दिवसा व 3 टँकरने रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा करण्यात येत असून ज्या भागात नळ योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. अशा भागात पाण्याचे नियोजन सुरु असून नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन पाणी पुरवठा सभापती प्राजक्ता कराड यांनी केले आहे. पाणी न.प.च्या वतीने परळी शहरातील 16 प्रभागांचा विचार करता व कुठल्या भागात अधिक पाणी टंचाई आहे. अशा भागात टँकरच्या अधिक खेपा पुरविण्यात येत आहेत. वाण धरणातील पाणी साठा संपत असल्याने टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी न.प.च्या वतीने आणखी 17 टँकरच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला असून शहरातील 80 टक्के भागात नळ योजनेचे पाणी जात आहे. या भागात टँकरची संख्या कमी असून ज्या भागात नळ योजनेचे पाणी नाही त्या भागातील बोअर, विहिरीतील पाणी संपल्याने संपुर्णपणे टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने पाण्याच्या नियोजनाबाबत काहीशा तक्रारी येत आहेत. परंतु परळीकरांनी संयम बाळगून न.प.च्या वतीने वितरीत होणारे पाणी समप्रमाण घ्यावे जेणे करुन पाणी वाटपाचे योग्य नियोजन लावता येईल. पाऊस वेळेवर पडला नाही तर आणखी दोन महिने पाण्याचे नियोजन करावयाचे असून यासाठी न.प.च्या वतीने खडका येथील बंधारा, चांदापुर येथील तलावातून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल. तसेच आवश्यक त्याठिकाणी अधिगृहण करुन पुढील 2 महिन्याचे नियोजन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी कुठल्याही भुलथापांना बळी न पडता संयम बाळगावा असे आवाहन पाणी पुरवठा सभापती प्राजक्ता कराड यांनी केले आहे.

Related Articles

Close