You cannot copy content of this page
मनोरंजन

नवी मुंबईत महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव संपन्न…..

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नवी मुंबई येथे दि. 12/5/2019 रोजी शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी, नवी मुंबई व बसव सेवा प्रतिष्ठान, नवी मुंबईने आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला. इलकल (कर्नाटक) येथील चित्तरगी संस्थान मठाचे परम पूज्य गुरु महंत स्वामी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बसव साहित्य अभ्यासक शरण अरविंदअण्णा जत्ती, मुंबईस्थित प्रसिद्द्ध बांधकाम व्यावसायिक शरण महेश मुद्दा, साहित्यकार शरण सिद्धण्णा लंगोटी, साहित्यकार शरणी कल्याण्णम्मा लंगोटी अशा मान्यवर अतिथी गणांच्या उपस्थित ८८६ वा महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी मान्यवर अतिथींच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. साहित्यकार शरण सिद्धण्णा लंगोटी, साहित्यकार शरणी कल्याण्णम्मा लंगोटी यांनी बसवादी शरणांचे वचन आणि आपल्या जीवनात असणारे त्याचे स्थान याचे महत्व विशद करून सांगितले. तद्नंतर, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शरण महेश मुद्दा यांनी व्यवसाय करत असताना महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि आचार महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. शुध्द आणि निरंतर कायक केल्याने मनाला समाधान मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बसव साहित्याचे अभ्यासक शरण अरविंदअण्णा जत्ती आपल्या अमोघ शैलीतून बसवण्णांचे वचन उपस्थितांसमोर अतिशय सुंदर शब्दांत उद्दृध्त केले. या अनंत आणि विशाल ब्रम्हांडामध्ये मानवी जीवनाचे स्थान वैज्ञानिक पद्धतीने उदाहरण देत सर्वांना मंत्रमुग्ध केले. रोज किमान एक तरी बसवादी शरणांचे वचन वाचून त्यावर मनन केल्याने जीवनात आमुलाग्र व सकारात्मक बदल होतो असे शरण अरविंदअण्णा जत्ती यांनी सांगितले. परम पूज्य गुरु महंत स्वामींनी इष्टलिंग योग आणि मानव याचा सुंदर मिलाप उपस्थितांसमोर अतिशय सोप्या शब्दांत उलगडून दाखविले. लिंगयोगाने आपल्या देहाला देवत्व प्राप्त होते, जेथे जीव तेथे देव अशी संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अनेक वचनात मांडल्याचे त्यांनी सांगितले. ‘अरुवे गुरु’ म्हणजेच ‘ज्ञान हाच आपला गुरु’ असे महात्मा बसवेश्वरांनी सांगितले आहे आणि त्याला तुम्ही जागृत करा, आपल्या अंतरंगात डोकावून पहा आणि त्याप्रमाणे शुध्द व सुंदर जीवन जगा असे स्वामीजींनी सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. दररोज इष्टलिंग योग केल्याने हे सर्व सहज शक्य आहे असे स्वामींनी आवर्जून सांगितले. आपल्याला समृद्ध, संपन्न आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर इष्टलिंग योग करणे आवश्यक आहे असे स्वामींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये स्वामींच्या हस्ते नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शरण नागराज मजगे, धडाडीचे युवा पत्रकार शरण मंगेश चिवटे, सुप्रसिद्ध मूर्तिकार शरण शरणबसप्पा आल्लोळी यांचा त्यांच्या समाजाप्रती असणाऱ्या योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावर्षीचा ‘शरण रत्न’ पुरस्कार जेष्ठ शास्त्रज्ञ शरण शिवनगौडा ह. पाटील यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व भव्य अशा सन्मानचिन्हाने स्वामींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीने सुरु केलेल्या वाचनालयाचे उद्घाटन शरण अरविंद अण्णा जत्ती यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाले. समाजामध्ये चांगले विचार रुजवण्यासाठी पुस्तक हे प्रभावी माध्यम असल्याचे शरण अरविंदअण्णा जत्ती यांनी सांगितले. कार्यक्रमाला नवी मुंबई, मुंबई परिसरातील लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण सभागृह उपस्थिताने फुलून गेले होते. आयोजकांतर्फे सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ महंतशेट्टर, मंजुळा हिरेमठ, रामलिंगय्या, इरप्पा कोठीवाले, बिराजदार, विरय्या हिरेमठ, गोरख शिखरे, राजेंद्र बिडवे, म्हेत्री, चिलर्गे, कत्ते, कनवल्ली, आनंद गवी व अन्य सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सोमेश्वर गवी आणि गोरख शिखरे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले.

Related Articles

Close