You cannot copy content of this page
ठाणे

बनावट ‘फिटनेस सर्टफिकीट’ बनवून देणाऱ्या एका इसमाला ठाण्यात अटक….

बनावट 'फिटनेस सर्टफिकीट' बनवून देणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखा, घटक -१ ठाणे यांच्याकडून ६ मे २०१९ रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील काही ट्रान्सपोर्टच्या व्यावसायिकांना अवजड वाहनांचे आर.टी.ओ कार्यालयाकडून दरवर्षी पासिंग करणे गरजेचे असते. त्यामुळे ते आर.टी.ओ तील दलालांची मदत घेऊन ही कागदपत्रे बनवून घेण्याचे काम करतात. अशाच प्रकारे मोटार वाहनाचे आर.टी.ओ कार्यालयाचे बनावट कागदपत्र बनवून फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखा, घटक -१ ठाणेचे पोलीस शिपाई भगवान हिवरे यांना तनवीर शेख या तक्रारदाराकडून मिळाली. यासोबतच तक्रारदार यांचे व्यवसायातील दोन मोटर टेम्पोचे ठाणे आर.टी.ओ चे बनावट 'फिटनेस सर्टफिकीट' देखील बनवून दिल्याचे समजले. सदर 'फिटनेस सर्टिफिकेटची' ठाणे आर.टी.ओ कडून गुन्हे शाखा, घटक -१ विभागाने सत्यता पडताळणी केली असता, ती बनावट असल्याचे उघड झाले. या मिळालेल्या सर्व माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने तनवीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर बनावट 'फिटनेस सर्टफिकीट' बनवून देणारा सदर इसम हा ठाणे रिक्षा स्टँडजवळ ठाणे रेल्वे (प) येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी सापळा रचून या इसमास अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता. त्याने ठाणे आर टी.ओ चे बनावट 'फिटनेस सर्टफिकीट' तयार करत असल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्याप्रकरणी या इसमास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १२ मे २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

Related Articles

Close