Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
नवी मुंबई

डोक्यावर केस उगवण्याच्या नादात हृदय बंद पडलं! रुग्णाचा मृत्यू…..

कपाळावर येणारे, दाट केस कोणाला आवडत नाहीत. पण, वाढतं वय, बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यांमुळे हल्ली केस गळून टक्कल पडतं. ते लपवण्यासाठी मग नानाविविध उपाय केले जातात. हेअर ट्रान्सप्लांट हा त्यातलाच एक उपाय. पण, ही शस्त्रक्रिया करण्याच्या नादात एका माणसाचं हृदय बंद पडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.मिळालेल्या वृत्तानुसार, श्रवण कुमार चौधरी (43) असं या मृत व्यक्तिचं नाव आहे. स्वतःचा व्यवसाय असलेल्या चौधरी यांनी गुरुवारी चिंचपोकळी येथील एका रुग्णालयात केस उगवण्याची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून ते पवईतल्या हिरानंदानी रुग्णालयात पोहोचले. त्यांचा चेहरा आणि गळ्यावर सूज आली होती. ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना ही एनाफिलॅक्सिस नावाची एक प्रकारची अॅलर्जी असल्याचा संशय आला. ही अॅलर्जी प्रतिजैविक असलेल्या औषधांमुळे उद्भवली असावी, असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यामुळे चौधरी यांना त्वरीत दाखल करण्यात आलं. मात्र, शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्यावर 9500 केसांचं पुनर्रोपण करण्यात आलं होतं. गुरुवारी तब्बल 15 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान चौधरी यांच्या घरातील कुणीही सोबत उपस्थित नव्हतं. कारण, चौधरी यांनी याबाबत कुटुंबीयांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. अशा शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला प्रतिजैविक आणि सलाईन दिलं जातं. त्यामुळे कधीकधी अशा प्रकारची अॅलर्जी येऊ शकते. सलाईन लावताना ते हातावर न लावता केसांजवळील भागात लावलं जातं. त्यामुळे जर रुग्ण पोटावर झोपला असेल तर सलाईनचं द्रव्य चेहऱ्याच्या दिशेने प्रवाहित होतं आणि चेहरा सुजतो. पण त्यामुळे कधीही मृत्यू होत नाही, असं पुनर्रोपण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.या प्रकारामुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. कारण, सहसा अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये मृत्यू ओढवत नाही. चौधरी यांना प्रतिजैविकांच्या अॅलर्जीमुळे मृत्यू आला असावा, असा त्यांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकारामुळे चौधरी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Close